उपशीर्षक :
सुरक्षा साधनांशिवाय उंच खांबावर काम; बॅरिकेडिंग व इशारा फलकांचा अभाव
पुसद | प्रतिनिधी
पुसद शहरातील एका वर्दळीच्या भागात नवीन वीज लाईन टाकण्याचे काम सुरू असताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. नवीन स्टीलच्या वीज खांबावर वीज खाजगी कामगार कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उंचावर बसून काम करत असल्याचे दिसून आले.
कामगाराने हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, इन्सुलेटेड हातमोजे यांसारखी आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरलेली नव्हती. काम सुरू असताना खाली वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. मात्र, कामाच्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेडिंग, "Men at Work" चे फलक किंवा इशारा चिन्ह लावण्यात आले नव्हते. त्यामुळे कामगारांसह नागरिकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत महावितरण व संबंधित कंत्राटदारांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नवीन वीज लाईनचे काम करताना कामगारांच्या जीवाशी खेळ होणार नाही, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
