पुसद | प्रतिनिधी : पुसद येथील सुप्रसिद्ध उद्योजक, वैद्यकीय तज्ज्ञ व समाजसेवक डॉ. सतीश चिद्दरवार यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'विदर्भ रत्न – २०२६' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील सोलिटेर हॉटेल अँड बँक्वेट्स येथे रिसिल ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ. चिद्दरवार यांनी वैद्यकीय सेवा, शिक्षण, जमीन विकास व बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. नागपूर येथे 'सुखकर्ता नागरी' या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातून ९०० हून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले. या प्रकल्पातील पहिल्या १०० घरांचे हस्तांतरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यापूर्वीही डॉ. चिद्दरवार यांना 'सुश्रुत जीवन गौरव', आयएमए जीवन गौरव पुरस्कार, लोकमत टाइम्स – आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया तसेच विविध सामाजिक व वैद्यकीय संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून गेली अनेक वर्षे ते वैद्यकीय सेवेसह शिक्षण, सामाजिक कार्य व विकासात्मक उपक्रमांत सक्रिय योगदान देत आहेत.विदर्भ रत्न' पुरस्कार मिळाल्यानंतर पुसद शहरासह यवतमाळ जिल्ह्यात त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, विविध सामाजिक, वैद्यकीय व व्यावसायिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान पुसद शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
