हिंगोली | प्रतिनिधी :
हिंगोली जिल्ह्यात हळद पिकासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारून शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणारे सुवर्ण क्रांतीचे जनक मा. ना. हेमंत पाटील यांना झी 24 तासच्या प्रतिष्ठित 'मराठवाडा सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंगोली व मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले हे संशोधन केंद्र शेती क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी मा. ना. हेमंत पाटील यांनी घेतलेले अभ्यासपूर्ण प्रयत्न, दूरदृष्टी आणि अथक तळमळ यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला आहे.
जगातील सर्वाधिक हळद उत्पादन करणाऱ्या भागांपैकी एक असलेल्या हिंगोली व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन केंद्र उत्पादनवाढ, दर्जेदार वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाच्या दृष्टीने मोठी क्रांती घडविणारे ठरत आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला 'मराठवाडा सन्मान' हा पुरस्कार हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. यानिमित्त मा. ना. हेमंत पाटील तसेच त्यांच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
