विदर्भ न्यूज मराठी पुसद प्रतिनिधी
तालुक्यातील वंदे भारत न्यूज चॅनलच्या जिल्हा प्रतिनिधीला एका अज्ञात इसमाने बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वाळू तस्करीसंदर्भातील बातम्या प्रकाशित केल्याच्या रागातून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अज्ञात इसमाने “तुम्ही वाळूवाल्यांविरोधात वृत्तपत्रात बातम्या लावता, त्यामुळे तुम्हाला बंदुकीच्या गोळीने ठार मारू,” अशी धमकी दिली. या प्रकरणी संबंधित पत्रकाराने २१ जून २०२६ रोजी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची एनसीआर नोंद केली असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही आजपर्यंत संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे नाईलाजास्तव संबंधित जिल्हा प्रतिनिधीने आपल्या सहकारी दैनिक व प्रिंट मीडियातील पत्रकारांसह १३ जुलै २०२६ रोजी पुसद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित पत्रकाराला संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर ॲड. अनिल ठाकूर, अब्दुल हमीद, मारोती भस्मे, बाबूलाल राठोड, बाबा खान, शेख महबूब शेख इब्राहिम, राजू सोनूने, संजय रेकावार , नवाज अली, मनीष दशरथकर, दीपक धर्माधिकारी, ॲड. प्रदीप नरवाडे, विष्णू धुळे, कैलास श्रावणी, किशोर कांबळे, अनिल चेंडकाळे, दिनकर गुल्हाने, सुनील सिंह काकन, विजय नखाते, उमेश जाजू, अहेमद पठाण, ज्ञानेश्वर मेटकर आदी पत्रकार व नागरिकांच्या सह्या आहेत.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात येत आहे.
