विदर्भ न्यूज मराठी पुसद प्रतिनिधी (जि. यवतमाळ) :
पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात उघडकीस आणला असून आरोपीस ताब्यात घेऊन चोरीस गेलेली स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी अप क्र. 271/2026, कलम 303(2) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी म्हणून रोहिदास उर्फ बाळा देविदास कांबळे (वय 30, रा. नवीन पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. 12 एप्रिल 2026 रोजी पुसद येथील मच्छी मार्केट परिसरातून स्कुटी चोरीची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, 13 एप्रिल रोजी पुसद परिसरात पेट्रोलिंग करत असताना मुखरे चौक येथे गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी मच्छी मार्केट परिसरात संशयित स्कुटीसह थांबलेला आहे.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाहनाचे कागदपत्र विचारले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. पुढील चौकशीत त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली. वाहनाच्या चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर ती स्कुटी सदर गुन्ह्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी अंदाजे ₹50,000 किमतीची स्कुटी जप्त करून आरोपीस पुढील तपासासाठी पुसद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
🔹 कारवाई करणारे पथक :
सपोनि धीरज बांडे, पो.उपनि. शरद लोहकरे, एएसआय मुन्ना आडे, हवालदार संतोष भोरगे, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, तसेच पोलीस कर्मचारी सुनील पडागळे व राजेश जाधव (पुसद–उमरखेड पथक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ).
