रोहड येथे शेतात तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
विदर्भ न्यूज मराठी पुसद, प्रतिनिधी : तालुक्यातील रोहड येथे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी घडल्याचा अंदाज असून ४ एप्रिल रोजी सकाळी ती समोर आली.
मृतकाचे नाव गणेश विष्णू गोरे (वय ३४, मूळ रा. पार्डी) असे आहे. तो पत्नी, एक मुलगा, आई-वडील व एक भाऊ असा परिवार असून शेती व्यवसाय करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गोरे हा ३ एप्रिल रोजी सायंकाळी शेतात जागरणासाठी गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. ४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान त्याची आई शेतात पाहण्यासाठी गेली असता, आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. हे दृश्य पाहताच तिने आक्रोश केला व गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील व सरपंच यांनी खंडाळा पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून खंडाळा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, गणेश गोरे हा आईकडे भाऊ नसल्याने रोहड येथील आजी-आजोबांची शेती पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.
