उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
विदर्भ न्यूज मराठी
राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150% दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणांबाबत विविध मागण्यांना मान्यता आणि पत्रकार यांच्यावर होणारे अन्याय थांबविणे
राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत वृत्तपत्र उद्योगावर आर्थिकदृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे. आम्ही अनेकवेळा व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने या संदर्भात निवेदन दिले, आंदोलन केले पण त्याचा फायदा झाला नाही. आपण आता तरी याकडे लक्ष द्याल ही आपेक्षा आहे.
सन 2019 पासून आजतागायत कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यबळ यांसारख्या मूलभूत खर्चामध्ये सुमारे 150% पर्यंत वाढ झालेली आहे. परंतु याउलट शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही समर्पक वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच विषयाला घेऊन गेल्या तीन दिवसापासून सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी लाक्षणिक मागणी करत आंदोलन सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर आठ मागण्याची निवेदन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसद यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा दंड अधिकारी पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
याशिवाय गेल्या काही दिवसांत राज्यात पत्रकारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू झाले आहे. अकोला येथे एका आमदाराविरोधात बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी गणेश सोनोने, साम टीव्हीच्या वार्ताहर हर्षदा सोनोने यांच्यासह अन्य तीन पत्रकारांवर हक्कभंग दाखल करून त्यांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
नांदेडमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवरून होताना दिसत आहे. पत्रकार मुक्ता कदम यांनी मनपा निवडणुकीदरम्यान पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या जनहिताच्या प्रश्नांवर बातम्या दिल्यानंतर, त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीरामपूर येथे गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पतसंस्थेतील गैरप्रकार उघड करणाऱ्या दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पनवेलमध्येही एका पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे तर पत्रकारितेचा गळा घोटण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. अवैध दारू विक्रीविरोधात बातमी दिल्याने पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न आठ जणांच्या टोळीने केला. सुदैवाने, त्यांच्या पत्नीने आणि गावकऱ्यांनी धाव घेतल्याने हा प्रयत्न फसला. याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सर्व घटनांचा निषेध करताना 'व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम संबंधित सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
सर्वांच्या कल्याणासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत.
त्यामुळे वरील सर्व मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो शासन निर्णय घ्यावा, नाहीतर पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे उपाध्यक्ष मंगेश पारटकर अविनाश आखरे. कार्याध्यक्ष मदन बडगुजर कोषाध्यक्ष शेषराव राठोड सरचिटणीस विकास मनवर. सहसरचटणीस पुरुषोत्तम सोडगीर कार्यवाहक यशवंत जाधव प्रसिद्धी प्रमुख अरुण बरङे संघटक रवी खरात गुलाब वाहुळे रविकांत सिंगणकर सदस्य अरविंद कांबळे विजय चव्हाण नंदकिशोर बंग मुन्ना सिद्दिकी नरेंद्र पुलाते बाळू ढोले प्राध्यापक सुनीता पवार मोहम्मद हनीफ शेख अश्विन केवटे देविदास चव्हाण व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष राजेश ढोले जिल्हा सचिव राजेश सोनुने कार्याध्यक्ष शब्बीर शेख सदस्य कैलास श्रावणे शेख मेहबूब यांच्या स्वाक्षरी आहेत
