विदर्भ न्यूज मराठी*पुसद (प्रतिनिधी) – पुसद शहरातील महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या विविध महत्त्वपूर्ण पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर होताच शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला नवचैतन्य लाभणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नवीन नियुक्त्यांमध्ये प्रा. गोविंद फुके यांची राज्य मार्गदर्शक मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा संघटनेला निश्चितच मोठा फायदा होणार आहे. प्रवीणजी मस्के यांच्यावर राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मनोज नाईक यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ॲड. बाबुराव मस्के यांची राज्य प्रभारी (लिगल सेल) म्हणून निवड करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळणार असून, योगाच्या प्रसार-प्रचारासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात योगाचे महत्त्व पोहोचवणे आणि युवकांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवणे या दृष्टीने या नेतृत्वाचा मोठा हातभार लागणार आहे.
संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, प्रसाद कुलकर्णी (जनसंपर्क अधिकारी) तसेच डॉ. कृणाल महाजन (राज्य कार्यकारी अध्यक्ष) यांनी सर्व नव-नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“आपल्या सर्वांच्या सक्षम नेतृत्वात संघटनेचे कार्य अधिकाधिक प्रगतीपथावर जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुसद शहरातील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडूनही नव्या पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी आशा व्यक्त केली आहे.
.
