कीर्तनाच्या पावन सानिध्यात ‘शांताआई बेघर निवारा केंद्रा’ची मुहूर्तमेढ
पुसद : आईच्या आजारपणात तब्बल पाच ते सहा वर्षे अहोरात्र सेवा-शुश्रूषा केल्यानंतर, समाजातील निराधार व बेघर वृद्धांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेऊन गजानन जाधव यांनी ‘शांताआई बेघर निवारा केंद्रा’ची संकल्पना साकारली आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज स्मृतीस्थळ, पार्डी रोड, निंबी येथे ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज केसाळे यांच्या कीर्तनाच्या पावन सानिध्यात या केंद्राची अधिकृत घोषणा करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
स्वर्गीय सौ. शांताबाई दत्तात्रय जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आईच्या निधनानंतर अनेक असहाय्य, आजारी व बेघर वृद्धांची होणारी अवस्था पाहून, ‘ज्यांना कोणीच नाही त्यांची सेवा करणे हीच खरी मातृसेवा’ या भावनेतून केंद्राची संकल्पना पुढे आली.
शेड उभारणीसाठी १ लाख ११ हजार १०१ रुपयांची मदत
केंद्राची घोषणा होताच समाजातून मदतीचा ओघ सुरू झाला. स्वर्गीय सतीशभाऊ बयास यांच्या जयंतीनिमित्त श्री. मनीषभाऊ शहा यांनी निवारा केंद्राच्या शेड उभारणीसाठी १ लाख ११ हजार १०१ रुपयांचे दान जाहीर केले. तसेच ‘माणुसकीची भिंत’ परिवाराच्या वतीने गजानन इंगोले (मोती नगर) यांना इलेक्ट्रिक सायकल प्रदान करण्यात आली.
कायमस्वरूपी जागा उपलब्ध होईपर्यंत कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतीस्थळाजवळ गजानन जाधव यांच्या शेतातील सुमारे ५ हजार चौरस फूट जागेवर केंद्राचा तात्पुरता विकास करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे दीड ते दोन हजार चौरस फूट जागेवर पक्के व सुरक्षित शेड उभारण्यात येणार असून उर्वरित जागेत बाग, वॉकिंग ट्रॅक आणि वृद्धांसाठी योगाभ्यासाची स्वतंत्र जागा विकसित केली जाणार आहे.
या केंद्रात दाखल होणाऱ्या निराधार व बेघर वृद्धांना निवास, दोन वेळचे भोजन व दैनंदिन आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्यांना नातेवाईक अथवा सांभाळ करणारे कोणीही नाही, अशांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.
वृद्धांच्या हक्कांसाठी कायदेशीर मदत
वृद्धांना मुले किंवा नातेवाईक असूनही त्यांचा सांभाळ केला जात नसल्यास, संबंधितांना कायदेशीर नोटीस देऊन ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या संपत्तीबाबत कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी ॲड. नितीन विजयराव जाधव हे विधी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच दाखल वृद्धांच्या नियमित आरोग्य तपासणी व उपचारांसाठी डॉ. विहार बिडवाई यांचे वैद्यकीय सहकार्य लाभणार आहे.
समाजातील दानशूर नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमासाठी सढळ हाताने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. दत्तात्रय जाधव, श्री. गजानन दत्तात्रय जाधव व ‘माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन’ परिवाराच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मिशन ग्रीन वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, रुग्ण मित्र फाउंडेशन, गुरुदेव सेवा मंडळ, सप्त खंजिरी वादक संघ महाराष्ट्र राज्य, गणेश धर्माळे सर यांच्यासह पार्डी, निंबी व पुसद परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
