पुसद (प्रतिनिधी) : निंबी व पार्डी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, रुग्ण मित्र फाउंडेशन व गुरुदेव सेवा मंडळ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शेतकरी मार्गदर्शन व संवाद मेळावा कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ, पार्डी रोड, निंबी (जाधव बाग) येथे उत्साहात पार पडला.
मेळाव्यात पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच भाजीपाला व ताजा शेतमाल मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतमाल कच्च्या स्वरूपात विकण्याऐवजी त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते, असा सल्लाही बिजवल यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांनी शेती व शेतमाल विक्रीसंदर्भातील विविध समस्या मांडल्या. त्यापैकी काही समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरित प्रश्नांवर प्रशासकीय पातळीवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी शेतात उत्पादित केलेला भाजीपाला कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांना विक्री करणाऱ्या निंबी व पार्डी परिसरातील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल पुरस्कारप्राप्त शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून सप्तखंजरी वादक पंकज पाल महाराज व माणुसकीची भिंतचे मार्गदर्शक ॲड. नितीन जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील ठाकरे व पवन बोजेवार यांनी केले, तर आभार रमेश डंबोळे यांनी मानले. मेळाव्यास निंबी व पार्डी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
