"परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा महसुली कामांसाठी होणारी धावपळ थांबणार"
किनवट प्रतिनिधी - मार्कंडेय सिरामवार
किनवट
किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरातील नागरिकांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, इस्लापूर येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे इस्लापूर परिसरातील नागरिकांना महसुली कामांसाठी किनवट तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
इस्लापूर परिसरातील वाढती लोकसंख्या, भौगोलिक अंतर आणि महसुली कामांचा वाढता व्याप लक्षात घेता स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी या महसूल मंडळांचा समावेश होणार असून, किनवट तालुक्यातील बोधडी (बु.), देहली, मांडवी , उमरी (बा.) आणि सिंदगी (मो.) ही महसूल मंडळेही या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहेत.नवीन अपर तहसीलदार कार्यालयामुळे महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्याची अपेक्षा आहे. जमीन महसूल, विविध दाखले, फेरफार, शासकीय योजनांशी संबंधित कामे तसेच इतर महसुली सेवांसाठी नागरिकांना स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या कार्यालयासाठी अपर तहसीलदार पदाची नियुक्ती करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना कायद्यानुसार आवश्यक अधिकार व कर्तव्ये प्रदान केली जाणार आहेत.
शासनाच्या निर्णयानुसार कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून 15 दिवसांच्या आत प्रत्यक्ष कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
इस्लापूरसह किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी हा निर्णय महसूल प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
