उंचीतील जीवघेण्या फरकामुळे दुचाकीस्वार गंभीर; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विदर्भ न्यूज मराठी प्रतिनिधी | पुसद
पुसद-दिग्रस राज्य महामार्गावरील पुस नदीवर सुरू असलेल्या अपूर्ण पुलाच्या ठिकाणी सुमारे एक फुटाचा उंचीतील फरक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतला. १९ ऑगस्ट रोजी रात्री प्रीतम दीपक पवार (२८, रा. शिवाजी वॉर्ड, पुसद) हे दुचाकीने घरी परतत असताना त्यांची दुचाकी या उंचीतील फरकावर आदळून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पुसद नगर परिषदेचे नगरसेवक राजेश मल्हारी साळुंके आणि जखमी प्रीतम पवार यांच्या आई योगिता दीपक पवार यांनी २९ ऑगस्ट रोजी पुसद पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, नवीन पुलाचे बांधकाम आणि त्याला जोडणाऱ्या मार्गामध्ये सुमारे एक फुटाचा उंचीतील फरक ठेवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रकाशव्यवस्था, परावर्तक दिवे, धोक्याचा इशारा देणारे फलक अथवा सुरक्षिततेसाठी अडथळे लावण्यात आले नव्हते. त्यामुळे अंधारात हा धोका न दिसल्याने पवार यांची दुचाकी त्यावर आदळली. या धडकेत दुचाकीच्या पुढील चाकाची रिंग वाकून तुटली आणि पवार पुलावर फेकले गेले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चेहरा, तोंड आणि छातीवरही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. प्रथम त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना यवतमाळ येथील संजीवनी बहुविशेषज्ञ रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पुलावरील धोकादायक उंचीतील फरक तातडीने दूर करून सुरक्षित मार्ग, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षा अडथळे उभारावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीसोबत घटनास्थळाची छायाचित्रे, अपघातग्रस्त दुचाकीचे नुकसान आणि रुग्णालयातील कागदपत्रे जोडण्यात आली आहेत.
कोट बॉक्स : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्ह्याची मागणी
अपूर्ण पुलावर सुरक्षा उपाय न करता वाहतूक सुरू ठेवण्यात आली. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. जखमीच्या उपचाराचा खर्चही संबंधितांकडून करून द्यावा.
— राजेश मल्हारी साळुंके, नगरसेवक, पुसद
