विदर्भ न्यूज मराठी पुसद | प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील गौळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील प्रलंबित विविध प्रश्नांच्या मागणीसाठी भारतीय सैनिक रंजीत चव्हाण व प्रमोद राठोड हे १७ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाला गोर सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, गौळ खुर्द ग्रामस्थ व गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोफाळी पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय, पुसद येथे निवेदन देऊन प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मागण्यांवर तत्काळ निर्णय न झाल्यास शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुसद-उमरखेड मार्गावरील गौळ खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्ता रोको आंदोलनात गावातील गोर बांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
