पुसद ता.प्र. पुसद येथील सप्तगिरीनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने परिसरातील लहान बालकांनी विविध प्रकारच्या फळझाडे, औषधी व शोभेच्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जबाबदारी स्वीकारली.
या उपक्रमात चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वृक्षारोपणाबरोबरच "लावलेले प्रत्येक झाड जगवायचे" असा दृढ संकल्प केला. उपस्थितांनीही वृक्षांचे नियमित संगोपन, संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारत हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण रक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी बालकांचे कौतुक करत, आजची पिढी पर्यावरणाबाबत जागरूक होत असल्याचे हे अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी चित्र आहे, असे सांगितले. या उपक्रमातून समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण झाला असून, प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश देण्यात आला.
