माहूर, प्रतिनिधी (अंबादास मुकटे): नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १३ मध्ये रस्ते व नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या रोगांचा धोका वाढला असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. नाल्यांची तातडीने स्वच्छता करावी, रस्त्यांची दुरुस्ती करून सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वार्ड क्रमांक १३ मधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
