आधुनिक शेती, विक्रमी उत्पादन आणि नियोजनबद्ध कृषी व्यवस्थापनाची राज्यस्तरावर दखल
पुसद | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील भोजला (ता. पुसद) येथील प्रयोगशील युवा शेतकरी निशांत विजय राऊत यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'प्रयोगशील शेतकरी पुरस्कार-२०२६' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त स्व. वसंतराव नाईक फाऊंडेशन व कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निशांत राऊत यांनी स्वतःची १२ एकर व बटईची ८ एकर अशा एकूण २० एकर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केळी, टोमॅटो, पपई, हळद, टरबूज, मिरची, सोयाबीन व कापूस या पिकांचे यशस्वी उत्पादन घेत शेतीला व्यावसायिक स्वरूप दिले आहे.
केळी पिकातून एका एकरात सुमारे ४३,५०० किलो उत्पादन घेऊन ₹४.३५ लाख, टोमॅटोतून २,२०० कॅरेट उत्पादनाद्वारे सुमारे ₹९ लाख, पपईतून ₹६ लाख, तर हळद लागवडीत तीन एकरांत १२६ क्विंटल उत्पादन घेत सुमारे ₹१७.६४ लाखांचे उत्पन्न मिळवून त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
योग्य नियोजन, ठिबक सिंचन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर निशांत राऊत यांनी, "शेतीत यश नशिबावर मिळत नाही; ते ज्ञान, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास आणि प्रामाणिक कष्ट यांच्या बळावर मिळते," असा विश्वास व्यक्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांचा हा सन्मान प्रेरणादायी ठरत आहे
