पुसद:
एकीकडे लहान मुलांचे कुपोषण रोखण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे पुसद तालुक्यातील 'फेट्रा बीट'मध्ये मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाड्या मागील दोन महिन्यांपासून चक्क बंद असून, लहान मुले आणि मातांच्या तोंडातील हक्काचा 'अमृत आहार' गायब झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद नवाज अली यांनी थेट यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केल्याने महिला व बाल विकास विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार सय्यद नवाज अली यांनी २७ जून २०२६ रोजी फेट्रा बीटमधील जवळा, सावरगाव गोरे, नानंद क्र. १ आणि ३, आडगाव क्र. १ आणि २, जवळी, खंडाळा आणि अमृतनगर अशा एकूण ९ अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. मात्र, या सर्वच्या सर्व अंगणवाड्या बंद असल्याचे त्यांना आढळून आले. मे २०२६ पासून हा सावळागोंधळ सुरू असून, गरोदर माता, स्तनदा माता आणि ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंतची बालके पूरक पोषण आहारापासून वंचित आहेत. यामुळे परिसरात कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, बंद अंगणवाड्यांचे फोटो काढून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरीय उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी, आर्थिक व्यवहारांचे ऑडिट व्हावे आणि लहान मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुपरवायझरकडून '३५ टक्के' कमिशनची मागणी?
या प्रकरणात केवळ निष्काळजीपणा नसून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप आहे. संबंधित सुपरवायझर अमृत आहार योजना आणि बचत गटांकडून कथितपणे ३५ टक्के रकमेची बेकायदेशीर वसुली करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जे बचत गट हे कमिशन देण्यास नकार देतात, त्यांना 'चौकशी लावून सेवेतून काढून टाकू', अशी धमकी दिली जात असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
