माहूर | प्रतिनिधी : अंबादास मुकटे
माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर सातव्या दिवशी यशस्वी ठरले. चारही डीपीआरमधील लाभार्थ्यांना ३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी थेट खात्यात जमा करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यासाठी मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी तातडीने मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतला.
उपोषणकर्ते आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह रेणुकादास बेलखोडे, प्रमिलाबाई जाधव, सुनीता जाधव, विमलबाई जाधव, रेणुकाबाई बाबटकर व सुमनबाई वाठोरकर यांनी सात दिवसांनंतर आपले आंदोलन मागे घेतले.
सहाव्या दिवशी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे व सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी घरकुल लाभार्थी महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपल्या हालअपेष्टा मांडल्या. त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे उपस्थित अधिकारीही भावूक झाले आणि तातडीने तोडगा काढण्याची गरज अधोरेखित झाली.
म्हाडा अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर चारही डीपीआरसाठी ३ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मंजुरीनंतर हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मुख्याधिकारी विवेक कांदे मुंबईला रवाना होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यासोबतच नगरपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी, महामार्गावर गतीअवरोधक उभारणे आणि परवानगीशिवाय प्रीपेड मीटर बसविण्यात येऊ नयेत, या मागण्यांनाही प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
यावेळी पोलीस व प्रशासनातील अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
विदर्भ न्यूज मराठीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, या आंदोलनाने प्रशासनालाही तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडल्याची चर्चा माहूर शहरात सुरू आहे.
