पुसद, प्रतिनिधी : वैद्यकीय, शिक्षण, बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शहरातील सुप्रसिद्ध डॉ. सतीश चिद्दरवार यांना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पुसद वैद्यकीय संघटनेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. डॉ. सुप्रिया चिद्दरवार यांच्यासह त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आयएमए हॉल येथे झालेल्या कार्यक्रमाला डॉ. यादराव सूर्यवंशी, डॉ. अविनाश जाधव, डॉ. वीरेंद्र पापळकर, डॉ. संजय अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. चिद्दरवार म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी जनसेवेची प्रेरणा असून अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवा करत राहीन.”
डॉ. चिद्दरवार यांनी मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत वैद्यकीय संघटनेने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
