पुसद, दि. २१ जून : आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र योग शिक्षक संघ व भारतीय जनता पार्टी, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन विरंगुळा योग केंद्र येथे मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास योगसाधक, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र योग शिक्षक संघ दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करीत असतो. योगामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक लाभ मिळून व्यक्तीच्या जीवनात नवचैतन्य, आनंद, उत्साह व स्फूर्ती निर्माण होते. योग ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आज संपूर्ण जगभरात त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. योग चळवळीत पुसद शहराचे योगदान उल्लेखनीय असून या क्षेत्रात पुसदने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. आरती फुफाटे तर. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार उपस्थित होते. यावेळी प्रा. गोविंद फुके (राज्य मार्गदर्शक मंडळ सदस्य, भाजप पुसद विधानसभा प्रभारी डाॅ.रूपाली जयस्वाल (भाजप नगरसेवक दिपक काळे,पुसद तालुका अध्यक्ष निलेश पेंशनवार ,व संयोजक कैलास गावनर ,विलास पलीकोंडावार (माजी राज्य मार्गदर्शक मंडळ अध्यक्ष, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनोज नाईक, प्रवीण मस्के राज्य उपाध्यक्ष, शैलेजा मडके जिल्हा सचिव, जिल्हा महीला प्रकोष्ट प्रभारी कल्पना मस्के, ॲड. बाबूराव मस्के लीगल सेल प्रभारी, व मीडिया प्रभारी राजू सोनुने तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे गणेश पागीरे,प्रकाश जयस्वाल, योगेश पाली ,बाळासाहेब माने,सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देणारे गिरीश अनंतवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शंखनाद तन्मय मडके यांचे कौतुक करण्यात आले. याशिवाय नीट (NEET) परीक्षेत 99.94 परसेंटाईन प्राप्त केल्याबद्दल कु. सिध्दी शैलेश चिद्दरवार हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून तिच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व विशद करत प्रत्येक नागरिकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात सामूहिक योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन व आभार जिल्हाध्यक्ष मनोज नाईक यांनी पाहिले तर आभार प्रवीण मस्के राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांनी केले या कार्यक्रमाला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, योगशिक्षक, योगसाधक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम योगाबाबत जनजागृती करणारा आणि प्रेरणादायी ठरला.
