पुसद, दि. २१ जून : १२ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त महाराष्ट्र योगशिक्षक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद येथील ज्येष्ठ नागरिक भवनात भव्य सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार कॉमन योगा प्रोटोकॉल अंतर्गत ४५ मिनिटांचे योग सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
या योग कार्यक्रमात पुसद शहरातील सर्व योगप्रेमी, नागरिक, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनोज नाईक तसेच भाजप सदस्य कैलास गावनर यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्वेश्वर महादेव मंदिर, रामनगर, पुसद येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के, राज्य लिगल सेल प्रभारी ॲड. बाबुराव मस्के, विलास पलिकोंडावार, बालाजी माने, नरेंद्र सवाई, सुरेश खोसे, गजानन पाली आणि गोपाल सातळे यांची उपस्थिती होती.
यावेळी योग ही निरोगी व संतुलित जीवनशैलीची गुरुकिल्ली असून, प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अधिकाधिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या या सामूहिक उपक्रमात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
