मुंबई/यवतमाळ, दि. ३ जून : यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, शासनाकडून मदत वाटप करताना यवतमाळ जिल्हा तसेच उमरखेड तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात किरण मुक्कावार यांनी आज दि. ३ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तसेच कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कार्यालयात भेट देऊन त्यांच्या ओएसडीकडेही निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने शेजारील नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात मदत दिली, परंतु यवतमाळ जिल्हा व विशेषतः उमरखेड तालुका अपेक्षित मदतीपासून वंचित राहिला. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच जिल्ह्याला विशेष मदत पॅकेज द्यावे, अशी मागणी किरण मुक्कावार यांनी शासनाकडे केली आहे.
यावेळी शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
