महाराष्ट्र योगशिक्षक संघ व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेतर्फे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा
पुसद, प्रतिनिधी : महाराष्ट्र योगशिक्षक संघ, पुसद तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वानरे मंगलम योगवर्ग, लक्ष्मीनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक डॉक्टर मनोज निलपवार यांच्या अध्यक्ष खाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनोज नाईक, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजू सोनूने, राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के, राज्य लीगल सेल प्रभारी अॅड. बाबुराव मस्के तसेच निमंत्रित सदस्य गणेश पागिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष मनोज नाईक यांनी संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या अभंगातील ओळींचा संदर्भ देत वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय झाडे तोडू नयेत, असा दिलेला संदेश सांगून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. आज आपण ज्या फळांचा, फुलांचा आणि सावलीचा लाभ घेत आहोत, ती आपल्या पूर्वजांनी लावलेल्या वृक्षांची देण असल्याचे सांगत पुढील पिढ्यांसाठी शुद्ध ऑक्सिजन, फळे, फुले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “बच्चे कम, पेड़ ज्यादा” हा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांनीही पर्यावरण संवर्धनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. बाबुराव मस्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कोषाध्यक्ष गोपाल सातळे, चक्रधर नरवाडे, उद्धव भगत, नागोराव तावडे, सुनील खंदारे, संजय मनवर, अमर चंदन, अनंता पाटील, जिल्हा महिला प्रकोष्ठ प्रभारी कल्पनाताई मस्के, शैलेजा मडके, छायाताई भगत, शांताबाई हातमोडे, आश्विनी मस्के, पंचफुला नंदनवार, लीलाबाई चव्हाण, रुपाली सातळे आदी योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
