प्रतिनिधी पुसद : केंद्र सरकारच्या सततच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुसदमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकारने तातडीने इंधन दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
“इंधन दरवाढ कमी करा”, “महागाईला आळा घाला”, “सामान्य जनतेला दिलासा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी उपस्थित नेतृत्वाने इंधन दरवाढीवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत सांगितले की, इंधनाच्या वाढत्या दरामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने सर्व वस्तूंचे दर वाढले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनले आहे. केंद्र सरकारने जनहिताचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलवरील करात तात्काळ कपात करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व महाविकास आघाडीचे नेते शरदभाऊ मैद, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिनभाऊ नाईक आणि शिवसेनेचे मोहन विश्वकर्मा यांनी केले. यावेळी स्वप्नील जयस्वाल, झिया शेख, प्रवीण कदम, जुनेद शेख, विलास वाघमारे, रवी पांडे, वैभव सुने, ज्ञानदीप कांबळे, विजय बाबर, ॲड. विघ्ने, सुजित मानकामे, नगरसेवक जब्बार लाखे, गाझी ओसामा, फिरोज खान, इर्षद कुरेशी, प्रकाश नेमायते, अभिलाष खैरमोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
