पुसद उपविभागात पोलिसांची मोठी कारवाई : १७५ अनधिकृत लाउडस्पीकर हटवले
विदर्भ न्यूज मराठी पुसद (प्रतिनिधी) – ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पुसद उपविभागातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत धार्मिक स्थळांवरील तब्बल १७५ अनधिकृत भोंगे/लाउडस्पीकर नागरिकांच्या सहकार्याने हटवले आहेत.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समितीच्या बैठका घेतल्या. या बैठकींमध्ये नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम व संबंधित नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या सहकार्याने ही कारवाई राबविण्यात आली.
पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतून – ४७
वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतून – २५
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून – १०१
खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतून – ०२
असे एकूण १७५ अनधिकृत लाउडस्पीकर काढण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या आदेशाने करण्यात आली. पुसद, वसंतनगर, पुसद ग्रामीण व खंडाळा या चारही पोलीस ठाण्यांच्या ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी केली.
दरम्यान, पुसद उपविभागातील धार्मिक स्थळांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले भोंगे/लाउडस्पीकर नागरिकांनी स्वतःहून काढून पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
