विदर्भ न्यूज मराठी प्रतिनिधी पुसद : डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रज्ञापर्व समिती २०२६ च्या वतीने शहरात ७ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ७ एप्रिल) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
या प्रज्ञापर्वाचे उद्घाटन आज (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता होणार असून कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर, प्रमुख उपस्थिती माजी आमदार ऍडव्होकेट निले नाईक उपस्थित राहणार असून प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील खाडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
प्रज्ञापर्व अंतर्गत आठवडाभर विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेला प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील खाडे, उपाध्यक्ष, सचिव तसेच विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल. पु.कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवेंद्र खडसे यांनी मानले. या परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या प्रबोधनात्मक मेजवानीमुळे पुसद शहरात वैचारिक सामाजिक व बौद्धिक वातावरण निर्माण होणार असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
