पुसद, प्रतिनिधी (दि. १० एप्रिल २०२६) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात नागपूर येथील प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी सामाजिक समता, धर्म, शिक्षण आणि राजकीय जागरूकतेवर प्रभावी भाष्य केले. महात्मा फुले जयंती उत्सव समिती, पुसद यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रा. कुरेशी यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, “धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही.” तसेच “सांस्कृतिक संघर्ष हा मानवतेच्या मानगुटीवर बसलेला राक्षस आहे,” असे सांगत त्यांनी धर्माच्या नावाखाली समाजात निर्माण होणाऱ्या तणावावर टीका केली. “हजारांमध्ये फारच कमी लोकांना धर्म समजतो,” असे नमूद करत त्यांनी दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, “शिक्षण हाच खरा धर्म आहे,” हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा मूलभूत विचार आजही तितकाच लागू आहे. ‘सत्यशोधक’ विचारसरणी समाजात समता व बंधुता निर्माण करणारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रा. कुरेशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरव करत “सावित्रीबाईंच्या नैतिक पाठबळामुळेच ज्योतिबांची क्रांती यशस्वी झाली,” असे सांगितले. तसेच फातिमा शेख यांच्या स्त्रीशिक्षणातील योगदानाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. “स्त्रीशिक्षणामुळे समाजात मोठा बदल घडतो,” असे ते म्हणाले.
राजकारणाच्या संदर्भात बोलताना त्यांनी “राजकारण हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवणारी संस्था आहे,” असे सांगत नागरिकांनी राजकीयदृष्ट्या सजग राहण्याची गरज व्यक्त केली.
इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांच्या विचारांना पुढे नेत संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले. “फुले ते आंबेडकर विचारसरणी हीच सामाजिक न्यायाची खरी दिशा आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. उद्घाटन नगराध्यक्ष सौ. मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी आत्माराम जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सौ. विशाखा समीर गवळी उपस्थित होत्या. व बरेच मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती वाट यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाधव सर यांनी मानले. या व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जागृती निर्माण झाली असून महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
