माहुरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या मंदिरातील एकूण ११ दानपेट्या बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी उघडण्यात आल्या असून, भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांमधून संस्थानला मोठे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या एक महिन्यात रोख, ऑनलाइन आणि सोने-चांदी स्वरूपातील देणग्यांचा एकत्रित आकडा तब्बल ६५ लाख ०७ हजार ६१७ रुपये इतका झाला आहे.
संस्थानच्या सभामंडपातील ४, महालक्ष्मी माता-१, तुळजाभवानी माता-१, मंदिर परिसरातील २ तसेच परशुराम मंदिराकडे ३ अशा एकूण ११ दानपेट्या उघडण्यात आल्या. यावेळी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत, व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे व सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे उपस्थित होते.
दानपेट्यांमधून मिळालेल्या रकमेची मोजणी करण्यात आली असता २० लाख ६३ हजार ४७० रुपये रोख मिळाले. याशिवाय भाविकांनी अर्पण केलेले ४१ ग्रॅम ७४० मिली सोनं (१५ नथा) तसेच १ किलो ४७१ ग्रॅम चांदी प्राप्त झाली. परशुराम पाळण्यातूनही ७६५ ग्रॅम चांदी मिळाली. सोन्या-चांदीची पारख अधिकृत सोनार सुशील टाक यांनी केली.
दरम्यान, दि. ११ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान देणगी विभागात १६ लाख ७० हजार १८० रुपये रोख, तर १४ लाख ५० हजार ३९० रुपये ऑनलाइन स्वरूपात जमा झाले. पावतीद्वारे मिळालेल्या देणग्यांमध्ये ५ ग्रॅम ४३० मिली सोनं व ८३२ ग्रॅम ७३० मिली चांदीचा समावेश आहे.
सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे आणि बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवरही भाविकांनी संस्थानला मोठ्या प्रमाणात दान दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
