पुसद (प्रतिनिधी) – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुसद शहरात विनापरवाना लावलेले लाउडस्पीकर्स (भोंगे) काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज (दि. ५ एप्रिल २०२६) जामा मस्जिद (गढी वार्ड) व श्री संत हनुमंत बापू मंदिर (विठ्ठला वार्ड) येथील भोंगे स्वयंस्फूर्तीने काढण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रिट पिटीशन क्र. ४७२९/२०२१ तसेच पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रक व स्थायी आदेशानुसार ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २०००, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ याअंतर्गत विनापरवाना लाउडस्पीकर्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विश्वस्तांची तीन बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जामा मस्जिदचे अध्यक्ष इक्बाजल अहमद मीर आलम खान, सैफोद्दीन, बसरत अली आदी विश्वस्तांनी तसेच श्री हनुमंत बापू ट्रस्टचे अध्यक्ष हनवंतराव शिंदे, सुभाष चव्हाण, विष्णू रणखांब आदींनी मंदिरावरील भोंगे स्वेच्छेने काढून प्रशासनास सहकार्य केले.
पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे, अंमलदार अभिमन्यू चव्हाण व नितेश भालेराव यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही पार पडली.
दरम्यान, शहरातील इतर सर्व धार्मिक व सामाजिक संस्थांनीही विनापरवाना लावलेले भोंगे स्वयंस्फूर्तीने काढून कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
