सर्कल प्रतिनिधी शहापूर
देगलूर : येथील तुकाराम नगरी परिसरातील जिपी टावर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी आणि गलथान कारभार समोर आला आहे. बँकेतील कॅशियरने एका ग्रामीण भागातील महिलेला २२ हजार रुपयांऐवजी केवळ १० हजार रुपये देऊन घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महिलेच्या मुलाने वेळीच पैसे मोजल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित कॅशियर आणि उद्धट वागणूक देणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे आता संपूर्ण देगलूरकरांचे लक्ष लागले आहे.अधिकारी गप्पांत व्यस्त, ग्राहकांना तुच्छतेची वागणूक एककीडे कॅशियरची ही गंभीर चूक समोर आली असताना, दुसरीकडे बँकेतील 'चौकशी खिडकी'वरील चित्र संतापजनक होते. खात्यात किती शिल्लक आहे, हे विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मुलाला संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरली. बँकेत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही चौकशी अधिकारी आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारण्यात मग्न होते. सामान्य नागरिकांना सन्मानाने वागणूक देण्याऐवजी त्यांच्याशी उद्धटपणे बोलणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे. कठोर कारवाईची देगलूरकरांची मागणी या घटनेमुळे ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा साध्या ग्राहकांची बँकेत कशा प्रकारे लूट होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या १८ मार्च रोजी दुपारी १२:३० ते १ च्या सुमारास तुकाराम नगरी परिसरातील एक महिला पैसे काढण्यासाठी एसबीआय बँकेत गेली होती. विड्रॉल स्लिप २२ हजार रुपयांची असतानाही कॅशियरने महिलेच्या हातात केवळ १० हजार रुपये दिले. ग्रामीण भागातील ही महिला पैसे घेऊन बाहेर पडत असताना तिच्या सतर्क मुलाने पुन्हा पैसे मोजले. त्यात तब्बल १२ हजार रुपये कमी असल्याचे लक्षात येताच मुलाने थेट कॅशियरची केबिन गाठली. सुरुवातीला टाळाटाळ झाली, पण चूक समोर येताच कॅशियरने तातडीने उर्वरित १२ हजार रुपये मुलाच्या स्वाधीन केले.वरिष्ठ व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. पैसे कमी देणारा कॅशियर आणि ग्राहकांशी गैरवर्तन करणारा चौकशी अधिकारी या दोघांवरही कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता देगलूरच्या नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित विभाग यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

