* 'व्हॉईस ऑफ मीडिया'ची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दिग्रस : २३ मार्च २०२६ रोजी दारव्हा तालुक्यातील कारंजा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ सी वरील भुलाई टोल प्लाझा बंद करण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीचे आंदोलन होते. सदर आंदोलनाच्या वृत्त संकलनासाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे स्थानिक व जिल्हा प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. आघाडीचे पदाधिकारी आंदोलन करीत असल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने कारंजा रस्ता दारव्हा येथूनच काही वेळासाठी बॅरिकेट्स लावून बंद केला होता. तेथे तैनात पोलिसांना ओळख सांगून माध्यम प्रतिनिधींना वृत्त संकलनासाठी टोलनाक्यावर जाण्यास परवानगी दिली गेली. आंदोलनस्थळी कुठलीही स्फोटक अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी गंभीर स्थिती नव्हती. केवळ काही कार्यकतें घोषणा देत होते. तेवढ्यात कर्तव्यावर तैनात एपीआय पंकज दाभाडे यांनी कुठलेही कारण नसतांना शिघ्र आवेशात येऊन तेथील काही जणांना शिवीगाळ करीत हाकलने सुरू केले. याठिकाणी पत्रकार केशव सवळकर हे उपस्थित होते. दाभाडे यांनी त्यांना हात धरून लोटताच सवळकर यांनी आपण पत्रकार असल्याचे सांगत स्वतःचे ओळखपत्र त्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र दाभाडे यांनी चल साल्या, शहानपणा शिकवू नको, असे म्हणत अश्लील भाषेचा वापर करत जोरात हात पकडून पुढे ढकलले. काहीही बोलण्यास किंवा ऐकूण घेण्यास दाभाडे यांनी संधी दिली नाही. त्यामुळे पत्रकार केशव सवळकर यांना एपीआय पंकज दाभाडे यांनी केलेल्या धक्काबुक्की आणि गैरवर्तनावरून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन 'व्हॉईस ऑफ मीडिया' पत्रकार संघटनेच्या दिग्रस शाखेकडून आज दि. २७ मार्च रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
इतरही पोलीस अधिकारी संबंधित घटनास्थळी तैनात होते. मात्र केवळ दाभाडे यांनीच आपण किती सिंघम अधिकारी आहोत, हे दाखविण्यासाठी आवेश दाखविला. एका पत्रकाराचा लोकांत अवमान होईल व पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचेही अवमूल्यन होईल, अशा पद्धतीने दाभाडेंनी वर्तन केले. कालांतराने पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून दारव्ह्याचे एसडीपीओ डॉ. सिद्धेश्वर भोरे व ठाणेदार मुळे या दोघांनी मात्र हा विषय सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दाभाडेंच्या चेहऱ्यावर केलेल्या कृत्याबद्दल कुठलेही चुकीचे भाव वाटत नव्हते. एकंदरीत अशा अधिकाऱ्यांमुळे पोलीस प्रशासन व माध्यमातील सुसंवादाची दरी अधिक वाढू शकते. त्यामुळे एपीआय दाभाडेविरुद्ध सेवाशिस्त वर्तणुकीत गैरवर्तन करणे, मानहाणी होईल, असे प्रतिष्ठित पत्रकारांसोबत वागणे या बाबीवरून कारवाई करावी, असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर धर्मराज गायकवाड, प्रशांत झोळ, जुबेर खान, सुनिल हिरास, किशोर कांबळे, सदानंद जाधव, साजिद पतलेवाले, जय राठोड, आजीस शेख, शोएब सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
