पुसद: तालुका प्रतिनिधी
एस. एल. फाउंडेशन, यवतमाळच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित 'श्रमसंस्कार पुरस्कार २०२६' पुसद येथील निस्वार्थी सेवाभावी 'मानुसकीची भिंत सोशल फाउंडेशन' या स्थानिक संस्थेला प्रदान करण्यात आला. पुसदच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी यवतमाळ येथील दाते कॉलेज ग्राउंडवर झालेल्या भव्य 'बुढीचा चिवडा वर्ल्ड रेकॉर्ड' सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ११,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र असे होते. विशेष म्हणजे, पुसद येथील 'मानुसकीची भिंत' संस्थेने पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेली ११,००० रुपयांची संपूर्ण रोख रक्कम पुसद येथील 'शांताई बेघर निवारा केंद्रा'च्या मदतीसाठी व औषधोपचारासाठी देण्याची अत्यंत कौतुकास्पद घोषणा केली.
गेल्या दहा वर्षांपासून ही संस्था निष्ठेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यामध्ये रोज सकाळ सायंकाळ अविरत अन्नदान, वंचित घटकांची सेवा, गरजूंना उपयोगी वस्तूंचे वितरण, अन्नदान रथ तसेच पर्यावरण जन जागृतीसारखे अनेक अभिनव उपक्रम सातत्याने सुरू आहेत.
'मानुसकीची भिंत' संस्थेचे अध्यक्ष श्री. गजानन जाधव आणि फाऊंडेशनच्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांनी हा सन्मान स्वीकारला. एस. एल. फाउंडेशनच्या वतीने या ऐतिहासिक आणि आनंददायी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव पंजाबराव ढेकळे तसेच सदस्य अनंता चतुर,मंगेश भगत सर,अरुण नागुलकर,दिगंबर देशमुख,धनंजय आघाम,तसेच महिला सदस्या मोनिकाताई जाधव,कामिनीताई चतुर व स्वातीताई भगत यांची उपस्थित होती
