*आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वावर विश्वास; विठ्ठल प्रेमसिंग राठोड यांच्यावर युवक काँग्रेसची जबाबदारी सोपविण्याचे संकेत*
माहूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत माहूर तालुक्यातील विविध गावांतील शेकडो राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या प्रवेशामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सोहळ्यात नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तरुण कार्यकर्त्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देत, तरुणांना पक्षाच्या कामात सक्रिय सहभागी करून घेण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.
या वेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विठ्ठल प्रेमसिंग राठोड यांच्यावर माहूर तालुका युवक काँग्रेसची धुरा सोपविण्याबाबत घोषणा केली. राठोड यांच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांचे संघटन अधिक सक्रिय व मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून पुढील अधिकृत निर्णय अपेक्षित आहे.
सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध
तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देणारी असल्याचे सांगितले. पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माहूर तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंचकराव देशमुख, मोहन राठोड, माहूर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, राजू भिकू राठोड, राजू सौंदलकर, शेख सादिक, शेख मोबिन, करीम शाह, अजीम सैय्यद, शरीफ शेख, हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, जिल्हा सचिव पंजाबराव पाटील, काँग्रेस नेते दिलीप पार्डीकर, बाळू पाटील, योगेश चिल्लावार आणि अरविंद कंटाळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल प्रेमसिंग राठोड, उत्तम भिकू राठोड, सावंत बळीराम चव्हाण, रजनीकांत भारत चव्हाण, जीवन उत्तम चव्हाण, आकाश बलवंत चव्हाण, बलदेव गिरधारी, आशिष वसंत राठोड, मंगेश संजय राठोड, अतिष रमेश राठोड, अविनाश प्रकाश जमदाडे, देवानंद कैलास कांबळे, विनोद नथ्थू पाईकराव, नाना गोविंदा कांबळे, मोहन कनिराम आडे, रामसिंग वसराम नाईक, संजय मंगू चव्हाण, प्रदीप उत्तम राठोड, राजू वाघू कांबळे, पंकज गजानन पाईकराव, महेश अरविंद पाईकराव आणि हिरामण तुकाराम वाघमारे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे माहूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
