प्रतिनिधी पुसद ता. प्र. : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासत असल्याची जाणीव ठेवून सप्तगिरी नगर, पुसद येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने पक्ष्यांसाठी जलपात्र व अन्नसाखळी उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंदिर समिती तसेच सेवाधारी भक्तांच्या सहकार्याने मंदिर परिसरातील विविध ठिकाणी जलपात्र ठेवण्यात आले असून त्यामध्ये दररोज स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच पक्ष्यांसाठी गहू, ज्वारी, बाजरीसह विविध धान्य ठेवून अन्नसाखळीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील चिमण्या, कबुतरे, कावळे तसेच इतर पक्ष्यांना मोठा दिलासा मिळत असून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
“उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश देत मंदिर समितीने नागरिकांनीही आपल्या घरासमोर जलपात्र ठेवून पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे.
