विदर्भ न्यूज मराठी पुसद, प्रतिनिधी :
सोशल मीडियावरून पसरविण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्टप्रकरणी सविस्तर खुलासा करण्यात आला. या प्रकरणात संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी वाशिम रोड येथील डी एन कॉम्प्लेक्स येथे दि.१८ एप्रिल २०२६ रोजीच्या आयोजित पत्रकार परिषद मध्ये करण्यात आली.
पुसद शहरात फेसबुकच्या माध्यमातून एका प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रकार समोर आला असून संतोष राठोड या व्यक्तीने खोटी, निराधार व बिनबुडाची माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोस्टमुळे शहरात द्वेष व जातीवादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही नमूद करण्यात आले.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित व्यक्तीने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीस नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, आरोपीने सुरुवातीला आश्वासन देऊनही पोलीस ठाण्यात हजर राहणे टाळले.
दरम्यान, संबंधित पोस्ट पूर्णपणे खोटी व निराधार असल्याचे पुढे आले असून आरोपीने अखेर ही पोस्ट स्वतः टाकल्याची कबुली देत माफीनामा प्रसिद्ध केला आहे. तरीही या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये समाजातील एका मुलीचा संदर्भ देण्यात आल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
याप्रकरणी केवळ पोस्ट करणाऱ्यावरच नव्हे, तर त्या पोस्टवर आक्षेपार्ह व प्रक्षोभक प्रतिक्रिया देणाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच संतोष राठोड याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती देत, अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. नदीम, तालुका काँग्रेस कमिटीचे जिया शेख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
